Monday, July 27

संध्याकाळी भिंतींवर काल परवा उत्साहाने लावलेले बर्थ-डे टॅग्स काढले....भिंती एकदम सुन्या सुन्या वाटायला लागल्या. काय मजा असते, वाढदिवस, गेट-टुगेदर नंतर घराला किंवा त्या जागेवर एक पोस्ट सेलिब्रेशन रितेपण आल्यासारखं वाटतं. मनावर की भिंतींवर कोण जाणे पण असतं एवढं नक्की.
अशा इवेन्टची तयारी शेवटच्या क्षणापर्यंत होतच नाही पण ती तशीच कुठे कुठे अर्धवट रहावी असंही हळूच वाटत असतं.....तो दिवस येईपर्यंत.
वाढदिवसाची तयारी करताना आमच्या दोन मैत्रिणींची आवर्जून आठवण यावी कारण एकच...नुसता ओसंडून दाही दिशा वाहणारा उत्साह. त्यातली एक...तिचा स्वत:चा वाढदिवस कुणी विसरु नये याची खबरदारी ती आपणहून घेईल पण कोणी विसरण्याचा प्रयत्न केलाच तर ही स्वत:हून सांगणार...’ए मेरा बड्डे है, मुझे विश कर’ ;) स्वत: खपून ग्रिटिंग करण्यात( वेगवेगळ्या शकला लढवून केलेली) मॅडम ए़क्सपर्ट.
तयारी करता करता मनातून अलगद गोष्टींवर उतरलेला आनंद.....त्यामुळेच की काय त्या गोष्टींमध्येही जीव अडकतो. आणि त्या सगळ्या वस्तूही तशाच काहीतरी किडुकमिडुक...... चुकून सांडलेल्या रंगामुळे लाल,निळी काळी झालेली लादी/कार्पेट, ओबडधोबड,कसाही कापलेला थर्मॉकॉल....असंख्य पद्धतीने नंतर वापरासाठी कुचकामी ठरलेल्या वस्तू.
अगदी एका मित्राची पहिली वहिली कविताही....पण ह्याने पहिल्याच प्रयत्नात यमक बिमक जुळवलं होतन.....ती इकडून तिकडे पास होत शेवटी माझ्याकडे आली होती.
ती माझ्याचकडे आहे हे लक्षात असलं तरी कोणत्या नोट्सच्या कोणत्या पानात आहे हे माझं मीच आठवणं महाकठीण....पण ढिगारा उपसताना मिळाली. तेव्हाही त्याच पूर्वीच्या काही कोपर्‍यांवर दुमडलेल्या अवस्थेत, आणि त्याच्या किरटया अक्षरात. तसंच एक कॅडबरीचं कवरींग.....त्यावर उलटया बाजूला पेनाने लिहिलेली नोट......सगळ्यात अंशाअंशाने सगळे भेटतात. पिंपळाच्या पानासारखं असतं...बरेच दिवस जपून ठेवल्यावर छान जाळी पडते...फक्त शिरांचे बंध दिसतात.
हल्ली बाहेर पडावं तर फक्त लायब्ररीत जाण्यासाठी, इकडच्या तिकडच्या गोष्टी आणण्यासाठी....किंवा फक्त कामानिमित्त :( काहीतरी तरी एक कंटाळवाणं झालंय आईदर लाईफ किंवा मी च!
पण त्याच त्या बोअरींग जर्नीत काल आजी सोबत होती, त्यामुळे तेवढयातल्या तेवढयात नवीन काहीतरी..

लायब्ररी ही छोटेखानी, त्यामुळे त्यातली पुस्तकंही छोटीच(खास कॅटेगरीतली नसली म्हणजे ती छोटीशीच)...त्याच त्या ईंग्लिश नॉवेल्स( बहुतेक लव स्टोरीझ) बघूनच मला बोअर झालंय...हवी ती पुस्तकं मिळण्याचं हे ठिकाण नाही पर चलाना पडता है।
परवा मित्राने सांगितलेलं, 'Compelling Evidenses' त्यानेच अजून परत केलं नव्हतं....त्यामुळे बरीच शोधाशोध करुन शांता शेळकेंचं ’धूळपाटी’ घेतलं( त्यांची पुस्तकं म्हणजे खरं तर ललित लेखनच, पण इतक्या साध्या, सरळ आणि क्लासिक स्त्रीसुलभ शैलीत लिहिलेलं लेखन.....छान वाटतं वाचून.)
कारण याआधी ’गहिरे पाणी’ वाचायला घेतल होतं....गूढ-बिढ वाटण्याऐवजी आणखीनच बोअर झालं. तेव्हा जाडजूड काहीही डोळ्यासमोरही पाहवलं नसतं मला.
येताना रस्त्यावर फुलझाडांच्या गाडया घेउन फिरणा-याकडे सायलीचं रोपटं दिसलं आणि माउची आठवण आली....तिचा अचानक, बिलकुल प्लान न करता केलेल्या वाढदिवसाची संध्याकाळ ताजी झाली. मग मात्र जरा खुलून आजीशी गप्पा मारत, तिच्या संथ चालीशी चाल जुळवत घरी आले.