Friday, August 21

लॅबर्नम म्हणजेच बहावा.
पण बहावाच किती छान वाटतं!

आज कित्येक दिवसांनी सकाळी पावसाच्या दिवसात पावसारखं वाटलं.
दाट निळाशार रंग आणि हलकी रिमझिम...
चक्क खिडकीत बसून चहा, एकीकेडे मियॉं मल्हार ’आये बदरा बरसन को’....
’सावन झरियो झरि आयोरी
इतते उतते चहु दिस ते
बादरी गरज बरसायोरी॥

बान्धिया अम्बा पे झूला री
आवो सहेल्या मिल गावो री॥

Thursday, August 13

असे अबोल काही,
कुणी सांगावे..

ओळीत लपले,
स्वप्न पहावे...

सांज मिटता
तळाशी सारे
इरादेच सोडुनी द्यावे..

परागंदा अशा
कुणाचे गीत
मातीने तसेच गावे...

निजधर्मीचे
टाकुनी काही
वेलीवरती फूल फुलावे...

Wednesday, August 5

मी सकाळी बासरी ऐकलीये. कुठल्याही पंडित, उस्ताद, किंवा उत्तमोतम मैफील भरवणा-या कुणाचीही नाही. रस्त्यातून राजकपूरच्या ’बिगडे दिल शहजाद्यासारखा, थोडं थांबून थांबून मंझिल शोधत निघालेल्या’ एका वेडया मुशाफिराने ऐकवली. एवढं वर्णन करण्याइतकाच वेडा तो होता. असावा, पण पागल शायर नक्कीच नाही.

मला माझा रात्रीचा प्रवास आठवला. ९.०० चा काटा पुढे पुढे सरकला की दादरच्या पेंगत्या गर्दीला बाजूला करुन अक्षरश: संपूर्ण प्लॅटफॉर्म पळायचो. तिथेही अशीच पण दर्दभरी बासरी एकजण वाजवायचा...गौरीने शिव्या घातल्या तरी चक्क तिथे उभं राहून मी एकदा त्याचं पूर्ण गाणं ऐकलं. नंतर सवयीच्या झालेल्या शुभंकरोतीसारखं न चुकता सूर कानात भरुन ठेवला.

दोघंही वेगळे, त्यांची बासरीही वेगळी....त्या त्या क्षणी ते आवडून गेलेलं.....आजही हरवलेली सकाळ रिमझिम करत उमलून गेली. त्यातलीच एक गंमत म्हणजे, त्याच्यामागोमाग ’वासुदेव’ दिसला. हल्ली दिसतो तसा तो बर्‍याचदा....पण आज तो ही खास!!!! :)

Tuesday, August 4

कालच्या बी. टी मध्ये ’वॉट्स युअर राशी’ ची ऍड पाहिली. प्रियांका इझ लुकींग टू गुड( गुड हा शब्द अगदीच बुळबुळीत वाटतोय खरं); पण ’अतिसमर्पक’ शब्द वापरण्याची भिती वाटते हल्ली, लोकं काहीही अर्थ काढतात.
कोणत्याही आउटफिट मध्ये ती सहज सामावून जाते. अभिनयात ताकदीची असं काही अजून म्हणवत नाही पण मोस्ट मॉडर्न लुक्स, कॉस्चुम्स यात ती कॉन्फिडन्ट वाटते.
आपले जास्त होप्स आशुतोषवर.... :)