Monday, July 27

संध्याकाळी भिंतींवर काल परवा उत्साहाने लावलेले बर्थ-डे टॅग्स काढले....भिंती एकदम सुन्या सुन्या वाटायला लागल्या. काय मजा असते, वाढदिवस, गेट-टुगेदर नंतर घराला किंवा त्या जागेवर एक पोस्ट सेलिब्रेशन रितेपण आल्यासारखं वाटतं. मनावर की भिंतींवर कोण जाणे पण असतं एवढं नक्की.
अशा इवेन्टची तयारी शेवटच्या क्षणापर्यंत होतच नाही पण ती तशीच कुठे कुठे अर्धवट रहावी असंही हळूच वाटत असतं.....तो दिवस येईपर्यंत.
वाढदिवसाची तयारी करताना आमच्या दोन मैत्रिणींची आवर्जून आठवण यावी कारण एकच...नुसता ओसंडून दाही दिशा वाहणारा उत्साह. त्यातली एक...तिचा स्वत:चा वाढदिवस कुणी विसरु नये याची खबरदारी ती आपणहून घेईल पण कोणी विसरण्याचा प्रयत्न केलाच तर ही स्वत:हून सांगणार...’ए मेरा बड्डे है, मुझे विश कर’ ;) स्वत: खपून ग्रिटिंग करण्यात( वेगवेगळ्या शकला लढवून केलेली) मॅडम ए़क्सपर्ट.
तयारी करता करता मनातून अलगद गोष्टींवर उतरलेला आनंद.....त्यामुळेच की काय त्या गोष्टींमध्येही जीव अडकतो. आणि त्या सगळ्या वस्तूही तशाच काहीतरी किडुकमिडुक...... चुकून सांडलेल्या रंगामुळे लाल,निळी काळी झालेली लादी/कार्पेट, ओबडधोबड,कसाही कापलेला थर्मॉकॉल....असंख्य पद्धतीने नंतर वापरासाठी कुचकामी ठरलेल्या वस्तू.
अगदी एका मित्राची पहिली वहिली कविताही....पण ह्याने पहिल्याच प्रयत्नात यमक बिमक जुळवलं होतन.....ती इकडून तिकडे पास होत शेवटी माझ्याकडे आली होती.
ती माझ्याचकडे आहे हे लक्षात असलं तरी कोणत्या नोट्सच्या कोणत्या पानात आहे हे माझं मीच आठवणं महाकठीण....पण ढिगारा उपसताना मिळाली. तेव्हाही त्याच पूर्वीच्या काही कोपर्‍यांवर दुमडलेल्या अवस्थेत, आणि त्याच्या किरटया अक्षरात. तसंच एक कॅडबरीचं कवरींग.....त्यावर उलटया बाजूला पेनाने लिहिलेली नोट......सगळ्यात अंशाअंशाने सगळे भेटतात. पिंपळाच्या पानासारखं असतं...बरेच दिवस जपून ठेवल्यावर छान जाळी पडते...फक्त शिरांचे बंध दिसतात.

2 comments:

Deep said...

ए कोणाची कविता सापडली?

सखी said...

अजून कोणाची असणार...अशी एकदाच कविता केलेला एकच मित्र आहे :)