Wednesday, July 29

सकाळी सकाळी शेजारच्या घरातून मस्त बाळंतशोपाचा आणि बाळाला धुरी देताना येतो तसा वास आला. त्या छोटया बाळाला छान दुपटयात गुंडाळून ठेवलं होतं त्याच्या आजीने नि त्याचं उगीच कुईकुई चाललं होतं. त्याचा सूर लावलेला आवाज ऐकून साहजिक मजल्यावरची सगळी मंडळी म्हणजे बायकाच गोळा झाल्या. ’का हो रडतोय तो’ टाईप प्रश्न, सल्ले.....आणि आमचा हा/ही अशीच रडायचा/रडायची, मांडीवर घ्या, न्को दुपटंच सोडा...गरम होत असेल इ.इ.
पण या सगळ्यात बाळाची ताई आईला बिलगून आपली शांत बसली होती. मध्येच बायकांनी बोलण्यासाठी शांततेला मोकळीक दिली की हळूच आईला विचारत,’ मी मांडीवर घेउ त्याला?"
थोडया वेळाने एकीचा नियम लागू पडला आणि एवलेसे डोळे पेंगायला लागले. पण तेवढयाने शांत होतील त्या बायकाच नाहीत.
आत मोर्चा थोडक्यात तिच्यावर होता......"तू नाहीस का गं शाळेत गेलीस?"
"नाही...........सुट्टी आहे आज." पाळण्याची दोरी आईने तंबी दिल्यानंतर पण मनापासून हलवत म्हणाली. तिचं आपलं सगळं लक्ष त्याच्याकडे. कुतूहलाच्या दोन छोटया मासोळ्या पाळण्याच्या झोक्यासोबत हलत होत्या. तिच्या बाजूला जाउन हळूच विचारलं, "ताईबाई कसंय गं बाळ?, तुला ताई म्हटलं का गं त्याने?"
ताई म्हटल्याबरोब्बर एवढावेळ कोमेजून गेलेलं हसू कित्येक अंशांनी फुललं :)
"नाही त्याला बोलता येत नाहीये अजून."
"बघ लक्ष ठेव बरं का? पटकन हाक मारेल तुला."
त्यावर एक होकारार्थी, ......थोडं जबाबदारी आल्यासारखं स्माईल आलं आणि परत अलगद झोके सुरु झाले.

3 comments:

सर्किट said...

:-)

वा! मस्तच!

काय सही ऑब्झर्व्हेशन केलंय ताईबाईंचं.

Rashmi Jain said...

cute :)

सखी said...

:) थॅंक्स !!!